आपत्कालीन परिस्थितीचे भान ठेवून थेट कार्यवाही सुरू करावी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
वाढत्या रुग्णसंख्येनुसार नवीन रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न
मालेगाव, दि. 8 (उमाका वृत्तसेवा): मालेगाव शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मालेगाव शहरात महत्तम रुग्णसेवा देण्यासाठी सर्व पर्याय पडताळून त्यानुसार तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज दिले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून खाजगी डॉक्टरांनी देखील सामाजिक दायित्वातून रुग्णसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज केले.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंग, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, अपर पोलिस अधिक्षक संदिप घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजीत राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य प्रशासनाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, कोरोना व नॉन कोरोना या दोन्ही आघाड्यांवर समसमान लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे. यासाठी नवीन रुग्णालयाची बांधणी करायची झाल्यास त्यासाठी सर्वाधिकार असलेली समिती डॉ.पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून तिला सुरूवातीलाच तहसीलदार मालेगाव यांच्याकडे वर्ग केलेले 50 लक्ष रुपये निधीतून आवश्यकतेप्रमाणे खर्च करण्याचे आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
मालेगाव येथील स्वॅब नमुन्यांच्या तपासणीसाठी होत असलेला विलंब दूर करण्याकरता धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात दिवसाला पाच हजार स्वॅब तपासणीची सुविधा नव्याने सुरु करून घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून 38 लक्ष रुपये वर्ग करण्यात आले आहेत. या सुविधेचा लाभ आपणास घेता येईल. त्यामुळे तपासणी अहवाल प्राप्त होण्यास गती मिळेल.
जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे शहरातील सर्व पावरलूम बंद आहेत. नाशिक विभागाच्या तुलनेत सर्वाधिक मजूरांची संख्या मालेगावात आहे. या कालावधीत मजूरांना वेतन अदा करण्याचे शासनाने आदेश दिले असतांना जवळपास 105 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तात्काळ निकाली काढाव्यात. या आदेशाचे उल्लघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी कामगार उपायुक्तांना आज दिले. वैद्यकीय उपचारांच्या आवश्यक साधन सामग्रीसाठी निधीची कमतरता नाही. उपलब्ध सर्व रुग्णालयांमध्ये मुलभूत सुविधांसह पिण्याचे पाणी व सकस आहाराचा नियमीत पुरवठा करण्यात यावा, अशा सुचनाही त्यांनी आज दिल्या.
दाखल रुग्णांमध्ये हाय रिस्क व लो रिस्क रुग्णांच्या संख्या तपासून त्यांची शक्यता पडताळून स्वॅब तपासणीची दिशा ठरविण्यात यावी. आरोग्य सुविधेचे स्ट्रक्चर उभारुन त्यासाठी लागणारा आवश्यक स्टाफ हा आरोग्य संचालनालयाकडून उपलब्ध होणार असल्याने त्याचे सुक्ष्म नियोजन करुन चांगल्या आरोग्य सुविधांवर भर द्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.
0 تبصرے
bebaakweekly.blogspot.com